सिमला : हिंदूस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (HPCL) ऊना जिल्ह्यातील जितपूर बहेरीमध्ये ५०० कोटी रुपये खर्चून इथेनॉल प्लांट स्थापन करेल, असे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी सांगितले. मुख्यमंत्री सुक्खु यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत ३० एकरामध्ये प्रस्तावित असलेल्या या इथेनॉल प्लांटच्या उभारणीविषयक विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.
ते म्हणाले की, राज्य सरकार योजनेमध्ये ५० टक्के इक्विटी गुंतवणूक करण्यास तयार आहे आणि प्लांट स्थापन करण्यासाठी कंपनीला पुर्ण सहकार्य केले जाईल. कंपनीनेही मुख्यमंत्री सुक्खू यांना याबाबतचा प्रस्ताव संचालक मंडळासमोर ठेवला जाईल असे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्री सुक्खू यांनी जिल्हा प्रशासनाला भंजलच्या अॅप्रोच रोडसाठी १० दिवसांत जमीन अधिग्रहण सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यातून प्लांटच्या उभारणीत निर्माण होणारे सर्व अडथळे दूर होतील. सुक्खू म्हणाले की, हा इथेनॉल प्लांट कांगडा, हमीरपूर आणि विलासपुरातील स्थानिक लोक आणि शेतकऱ्यांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करेल. यासोबतच पंजाबच्या शेजारील जिल्ह्यांनाही धान्यावर आधारित इथेनॉल प्लांटपासून फायदा होईल. कंपनीच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला या प्लांटसाठी अतिरिक्त २० एकर जमीन उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.