शामली : केंद्र सरकारने हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) कडून उभारण्यात येणाऱ्या इथेनॉल प्लांटला मंजुरी दिली आहे. हा प्लांट ५०० कोटी रुपये खर्चून ३० एकर जमिनीवर उभारला जाईल. येथे इथेनॉल उत्पादनासाठी तांदूळ, ऊस आणि मक्क्याचा वापर कच्चा माल म्हणून केला जाईल. या योजनेमुळे विभागातील शेतकऱ्यांना मोठी मदत मिळेल. मुख्यमंत्री मुख्यमंत्री ठाकूर सुखविंद्र सिंह सुक्खू यांनी केंद्र सरकारसमोर हा विषय उपस्थित केला होता.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या प्लांट साठी कच्चा माल कांगडा, हमीरपूर, विलासपूर आणि ऊना या जिल्ह्यांतून खरेदी केला जाईल. शिवाय हा प्लांट कांगडा, हमीरपूर, विलासपूरसह राज्यातील इतर भागातील लोकांना रोजगाराची संधी, शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी देईल. या प्लांटमुळे विभागातील ३०० लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे.
या प्लांटमध्ये उत्पादित होणारे इथेनॉल पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिसळले जाईल. त्यातून वाहनांचे प्रदूषण कमी करण्यास मदत मिळेल. राज्याला जीएसटीच्या रुपात २० ते २५ कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळेल अशी शक्यता आहे. या प्लांटमध्ये राज्य सरकारने ५० टक्के भागीदारीस सहमती दर्शवली आहे. प्लांटच्या उभारणीतील अडथळे दूर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.