सोलापूर : साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टर चालकांच्य बेफिकिरीने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. फडातून ट्रॅक्टर कारखान्याकडे निघाल्यावर रस्त्याने ट्रॉलीमधील ऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या उसाचे अतोनात नुकसान होत आहे. शिवाय वाहतुकीलाही अडथळा होऊन अपघाताचा धोका वाढला आहे. साखर कारखाना व्यवस्थापनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
साखर कारखान्यांनी ऊस वाहतुकीबाबत योग्य उपाययोजना करावी, बेफिकीर चालकांना समज द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मोहोळ तालुक्यातील भीमा, जकराया, लोकनेते, आष्टी शुगर या साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाने गती घेतली आहे. ऊसतोडणी टोळ्या, तोडणी यंत्रणा कामाला लागली आहे. शेतकरी ऊस गाळपासाठी पाठवत आहेत. मात्र, फडात ट्रॅक्टरची ट्रॉली उसाने भरताना काम योग्य पद्धतीने होत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या मते, उसाच्या फडातून ट्रॅक्टर कारखान्याकडे जाताना ऊस रस्त्यात पडला तर चालकाने उसाच्या मालकाला फोन करून कळवावे. मदतीला बोलवावे आणि ऊस ट्रॉलीत टाकून न्यावा. पडलेला ऊस तसाच टाकून पुढे गेला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. उसाच्या मोळ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडल्या तर नुकसान सोसावे लागेल.