हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
औरंगाबाद : चीनी मंडी
जनावरांना पिण्याचे पाणी आणि चारा नाही म्हणून चारा छावण्या सुरू कराव्या लागलेल्या मराठवाड्यात यंदा उसाचे मुबलक उत्पादन झाले आहे. विभागातील ४७ साखर कारखान्यांकडून १६६ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करून ७७९ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. मात्र यासाठी वापरल्या गेलेल्या पाण्यामुळे मोठ्या धरणांमध्ये अवघा अर्धा टक्का पाणी उरले आहे. सद्यस्थितीत मराठवाड्यात २३०० टँकर सुरू असून ६०० हून अधिक चारा छावण्या सुरू आहेत.
सद्यस्थितीत महाराष्ट्र पाणी टंचाईने बेजार झाला आहे. राज्यात ४३२९ टँकर सुरू असून एकूण ११ हजार २५५ गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये त्याद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. राज्यातील धरण आणि तलावांतील पाणीसाठा फक्त पिण्यासाठीच वापर केला जाईल याची दक्षता घेण्याची निर्देश सरकारने दिले आहेत. तर मराठवाडय़ातील दुष्काळी स्थितीही गंभीर बनली आहे.
गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात मराठवाड्यात ४१ दिवस पाऊस झाला. त्यामुळे जायकवाडीसह अन्य धरणांमध्ये कमी पाणीसाठा झाला. त्यानंतर पाण्याची स्थिती पाहता नगर आणि नाशिकमधील धरणांतून ९ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न झाले. या जिल्ह्यांकडून वादंगानंतर ४.२० अब्ज घनफूट पाणी मिळाले. यंदा निवडणूक नजरेसमोर ठेऊन पाण्याच्या नियोजनाकडे काणाडोळा करण्यात आला. जायकवडीच्या उजवा, डावा कालव्यांतून तब्बल ७० दिवस पाणी सुरू ठेवले गेले. उसाला पाणी कमी पडू नये याची दक्षता घेतली गेली.
लातूर जिल्ह्यात यंदा सर्वात जास्त ३५ लाख २१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून ४० लाख २८ हजार टन साखर उत्पादन झाले आहे. याच लातूरमध्ये रेल्वने पिण्याचे पाणी आणावे लागले होते. अहमदनगर जिल्ह्यातील २३ कारखान्यांमधून १५० लाख १६ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. औरंगाबाद, नांदेड या दोन विभागांतील दुष्काळी स्थिती पाहता उसासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याने जलस्रोत खोल जाऊ लागल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. एक हेक्टर उसासाठी कॅनॉलने ४४ हजार घनमीटर पाणी सोडले तर उसाच्या मुळापर्यंत त्यातील निम्मेच पोहोचते असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. एका बाजूला दुष्काळ असूनही साखर उद्योग तेजीत आल्याचे दिसले. मराठवाड्यात जालना जिल्ह्यातील समर्थ, सागर, लातूर जिल्ह्यातील मांजरा कारखान्याने सर्वाधिक आठ लाख ४३ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. मांजरा धरणात पाणीसाठा कमी असल्याने उद्योगांच्या पाण्यात कपात करण्यात आली आहे.
यंदाच्या हंगामात राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी गाळप केले असून एकूण ९४८.६८ मेट्रिक टन गाळप राज्यात झाले आहे. त्यातून १०६६.६६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. मराठवाड्यात सर्वत्र टँकर सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक टँकरने पाणी दिले जात आहे. दुष्काळी स्थिती असलेल्या सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांतही साखरेचे उत्पादन चांगले झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३१ कारखान्यांमध्ये १६० लाख १४ हजार मेट्रिक टन गाळप झाले असून १६३ लाख ९६ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे हे विशेष.