हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनीमंडी
सलग दुसऱ्या वर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे तसेच, अपेक्षित निर्यात न झाल्याचा परिणाम साखरेच्या साठ्यावर होणार आहे. साखरेचा अतिरिक्त साठा मोठ्या प्रमाणावर राहणार असून, एकूण १४७ लाख टन साखर शिल्लक राहण्याची शक्यता आहे.
देशात गेल्या हंगामात ३२० लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा पाणी टंचाई आणि काही भागातील दुष्काळी स्थितीमुळे साखर उत्पादन कमी होईल असा अंदाज होता. पण, आतापर्यंत साखरेचे ३२२ लाख टन उत्पादन झाले असून, देशात एकूण ३३० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. देशाच्या बाजाराची गरज २६० लाख टन आहे आणि निर्यात ५० लाख टन अपेक्षित असली तरी ती ३० ते ३२ लाख टनच होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामातील विक्रमी साखर उत्पादनामुळे देशात १०७ लाख टन साखर शिल्लक होती. त्यामुळे महाराष्ट्रात हंगाम सुरू होण्यापूर्वीच ५३.३६ लाख टन साखर शिल्लक होती. महाराष्ट्रात अनपेक्षितपणे यंदा चांगली साखर उत्पादन झाले असून, एकूण १०७ लाख १० हजार टन उत्पादन झाले आहे. त्यामुळे राज्यात जवळपास ६० लाख टन साखर शिल्लक राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील गाळप हंगाम संपला आहे. उत्तर प्रदेशात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ११२.६५ लाख टन उत्पादन झाले आहे. परंतु, तेथे अजूनही ६८ कारखाने सुरू होते. त्यामुळे उत्तर प्रदेशात साखर उत्पादनात आणखी वाढ होईल, असा अंदाज आहे.