तरनाका : उन्हाळ्याला सुरुवात झाली असली तरी ऊस पुरवठादार आणि विक्रेत्यांना नव्या चिंतेने ग्रासले आहे. शहरात कोरोना व्हायरसच्या फैलावानंतर त्यांच्या व्यवसायावर पुन्हा बंदी आली आहे. लोक घराबाहेर पडण्यास धास्तावले आहेत. अनेक ठिकाणी सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे ऊस विक्रेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ऊसाचे घाऊक विक्रेते आणि उत्पादकांना गेल्यावर्षीही लॉकडाऊनच्या कालावधीत मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. आता चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा होती. मात्र, पु्न्हा एकदा कोरोनाच्या संकटाने गंभीर स्थिती निर्माण केली आहे.
ऊस उत्पादक कृष्णा यादव यांनी सांगितले की, गेल्यावर्षी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर आम्हाला ऊस फेकून द्यावा लागला होता. यावर्षी अद्याप लॉकडाउन लागू झाला नसला तरी अशा पद्धतीच्या अडचणी आमच्यासमोर आल्या आहेत. या हंगामासाठी मी १२ टन उसाची साठवणूक केली होती. मात्र, कोरोनामुळे ग्राहकच नाहीत अशी स्थिती आहे.