मला भविष्यात कोणतीही निवडणूक लढवायची नाही : शरद पवार यांची स्पष्टोक्ती

बारामती (महाराष्ट्र) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एससीपी) सुप्रिमो शरद पवार यांनी मंगळवारी जाहीरपणे सांगितले की, भविष्यात कोणतीही निवडणूक लढण्याचा त्यांचा इरादा नाही. मी 14 वेळा निवडणूक लढलो आहे, आणि माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर मी माझ्या संसदीय पदापासून अलिप्त व्हावे की नाही याचा विचार करेन, असेही शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे (एससीपी) अध्यक्ष पवार हे त्यांचा नातू युगेंद्र पवार यांच्या निवडणूक प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर आले होते.

तीनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या पवार यांनी आपल्या भाषणात नव्या पिढीवर जबाबदारी सोपवण्याची गरज असल्याचे सांगून जनतेची सेवा सुरू ठेवण्यासाठी त्यांना कोणतीही निवडणूक जिंकण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, मी सत्तेत नाही. मी राज्यसभेवर असून शेवटचे दीड वर्ष बाकी आहेत. मी याआधी 14 निवडणुका लढवल्या आहेत, आणखी किती निवडणूक लढवणार? आता नव्या पिढीला संधी द्यायला हवी, असे मला वाटते. मी यापुढेही सामाजिक कार्य करत राहीन आणि हे काम सुरू ठेवण्यासाठी मला कोणत्याही निवडणुकीची गरज नाही.

पवार म्हणाले कि, मी लोकसभा लढवणार नाही. मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. मी आतापर्यंत 14 निवडणुका लढवल्या आहेत आणि तुम्ही लोकांनी मला कोणत्याही निवडणुकीत घरी जाऊ दिले नाही. प्रत्येक वेळी तुम्ही मला निवडणुका जिंकायला लावल्यात म्हणून मी कुठेतरी थांबायला हवं. नवीन पिढी आणली पाहिजे. मी सामाजिक कार्य सोडले नाही, मला सत्ता नको आहे पण मी लोकांची सेवा करणे सोडलेले नाही, असे ते पुढे म्हणाले. पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 2026 मध्ये पूर्ण होणार आहे.

आपल्या राजकीय कार्यकाळाची आठवण करून देताना पवार म्हणाले, ३० वर्षांपूर्वी मी फक्त राष्ट्रीय राजकारण करायचे ठरवले आणि राज्याची सर्व जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपवली आणि जवळपास २५ ते ३० वर्षांपासून राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आता पुढील ३० वर्षांची व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्रात यायला हवे होते, असे अनेक मोठे प्रकल्प गुजरातमध्ये गेले असा आरोप करत त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.

ते म्हणाले कि, सरकार बदलण्याची गरज आहे. सत्ताबदलाशिवाय पर्याय नाही. आम्हाला अशा प्रतिनिधीची गरज आहे जो रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करेल. पवार घराण्याचा प्रदीर्घ बालेकिल्ला असलेल्या बारामतीत यावेळी पुन्हा कौटुंबिक लढाई पाहायला मिळणार आहे. कारण सातवेळचे आमदार अजित पवार यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांच्याशी सामना होणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केल्यानंतर या वर्षी दुसऱ्यांदा पवार विरुद्ध पवार असा या रंगतदार सामना होणार आहे.महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here