अहिल्या नगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ९९ टक्के एफआरपी दिल्याची खोटी माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. जर शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कमेवरील व्याज पंधरवड्याच्या आत दिले गेले नाही तर सोळाव्या दिवशी साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर (अहमदनगर) जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची बुधवारी पुण्यातील शिवाजीनगरमध्ये साखर संकुलात भेट घेतली. यावेळी त्यांनी हा इशारा दिला.
पोटे म्हणाले की, कायद्यानुसार शेतकऱ्यांना पंधरवाडा ऊस बिलावरील व्याज देणे बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही कारखान्याने अद्याप कार्यवाही केली नाही. ऊस बिलावरील व्याज दिलेले नाही. साखर आयुक्तांनीदेखील कारवाई केलेली नाही. दरम्यान, खेमनार यांनी प्रहार जनशक्तीच्या पाठपुराव्यावरून नगर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई केली जात असल्याचे सांगितले. यावेळी खेमणार यांनी अकाउंट विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत जिल्ह्यातील ९९ टक्के कारखानदार आणि शेतकरी यांच्यात एफआरपी रक्कमेबाबत करारनामा झाल्याचे सांगितले. तर पोटे यांनी कारखान्यांनी खोटे करारनामा साखर आयुक्तांकडे पाठवल्याचा दावा केला.