केंद्र सरकारचे धोरण सुरळीत राहिल्यास शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा दर मिळणे शक्य

मुंबई : राज्यात लवकरच यंदाचा साखर गाळप हंगाम सुरू होणार आहेत. सद्यस्थितीत गाळप हंगामासाठी उपलब्ध उसाचे क्षेत्र हे मागच्या वर्षीच्या तुलनेत २ लाख हेक्टरने कमी झाले आहे. मात्र यंदा मान्सूनचा पाऊस चांगला बरसल्याने कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा ऊसाला किती दर मिळेल याची उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये आहे. गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये प्रती टन २५० रुपये वाढ केली होती. मागच्या हंगामात प्रतिटन ३,१५० रुपये एफआरपी जाहीर केला होता. पण यंदाच्या म्हणजेच २०२४-२५ च्या गाळप हंगामात शेतकऱ्यांना प्रती टन ३,४०० रुपये मिळणार आहेत. पण यंदा केंद्र सरकारने चांगले धोरणे राबवले तर साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा चांगला दर देऊ शकतात असे मत साखर उद्योगाशी संबंधीत घटकांतून व्यक्त केले जात आहे.

मागच्या वर्षीचा म्हणजेच २०२३-२४ चा गाळप हंगाम १ नोव्हेंबर रोजी सुरू झाला होता. कारखाने उशिरा म्हणजे १५ मे पर्यंत सुरू होते. मागच्या वर्षी मान्सूनने पाठ फिरवली होती. राज्यात दुष्काळी स्थिती असूनही अवकाळी पावसाने उसाचे उत्पादन वाढले होते. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे १० कोटी ७६ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले होते. त्यातून ११० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. पण यंदा उसाखालील क्षेत्र जवळपास २ लाख हेक्टरने कमी झाले आहे. हंगामासाठी केवळ ११ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध असणार आहे. यंदा मान्सूनचा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र कमी होऊनही साखर उत्पादन १०० लाख टनापेक्षा जास्त होणार असल्याची शक्यता आहे. याबाबत विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले की, सोलापूर, मराठवाडा विदर्भात आणि एकूणच महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे उसाचे टनेज वाढेल. त्यामुळे यावर्षीसुद्धा १०० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. इथेनॉलला परवानगी दिल्यामुळे साखर उद्योगाला चांगली संधी मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here