पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन (विस्मा) चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले कि, महाराष्ट्र राज्यामध्ये चालू वर्षी पर्जन्यमान अतिशय चांगले झाल्यामूळे, अनुकूल हवामानामूळे व कोरडया वातावरणामूळे साखर उतारा वाढणार आहे. सध्या राज्यातील बऱ्याच गुळ पावडर व खांडसरी कारखान्यांनी ऊस गाळपास मोठ्या प्रमाणात सुरूवात केली आहे. मात्र सोशल मिडीया व वृत्तपत्रामधून विधानसभेच्या निवडणूकीचे कारण पुढे करून गळीत हंगाम दि. १५ नोव्हेंबर ऐवजी २५ नोव्हेंबरपासून सुरू करावा, अशा विनंतीवरून शासन गळीत हंगाम पुढे ढकलत असल्याचे समजते.
ठोंबरे म्हणाले कि, दि.१५ नोव्हेंबर २०२४ पासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीमध्ये घेण्यात आला, परंतू खाजगी साखर कारखाना संघटना ‘विस्मा’ने दि.५ नोव्हेंबर २०२४ पासून हंगाम सुरू करण्याबाबत मंत्री समितीस विनंती केली होती. गाळप हंगाम जवळपास १५ दिवस उशीरा चालू होत आहे. त्यामुळे अगोदरच ऊस तोडणी व वाहतूक मजुरांचे १५ दिवसांचे उत्पन्न बुडले आहे. शेतक-यांच्या ऊस तोडीस १५ ते २० दिवस विलंब होतो आहे व कारखान्यातील सर्व कर्मचारी व यंत्रणा १५ दिवस बसून असल्याचा दावा ठोंबरे यांनी केला.
ते म्हणाले, भारत सरकारच्या महत्वाकांक्षी इथेनॉल पेट्रोल मिश्रण कार्यक्रमाअंतर्गत तेल विपणन कंपन्याच्या पुरवठा निविदा नुसार नोव्हेंबर २०२४ च्या साठ्यात कमी पुरवठ्यामूळे राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये बाधा येवून, साखर कारखान्यांना दंडात्मक आर्थिक फटका बसेल. तसेच कांही भागांमध्ये ऊस पिकांना हुमणी किडीचा धोका असल्याने शेतक-यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. तसेच फेब्रुवारीनंतर उन्हाची तीव्रता वाढल्याने ऊस तोड मजूर मार्चमध्ये आपआपल्या गावी निघून जातात. त्यामुळे उभ्या ऊस पिकाची शेतक-यांपुढे व कारखान्यांच्या समोर मोठी गंभीर समस्या दरवर्षी उभी राहते. त्यामुळे साखर आयुक्तालय व राज्य शासनालाही आव्हानांचा सामना करावा लागतो.
ठोंबरे यांनी सांगितले कि, कर्नाटक, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यामध्ये दि. १० ते १५ नोव्हेंबर २०२४ पासून सर्व कारखाने सुरू होत आहेत. यामुळे आपल्या राज्यातील बरेच ऊस तोड आणि वाहतूक मजूर कर्नाटकसह इतर राज्यामध्ये स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे ऊस तोड आणि वाहतूक मजूरांच्या संख्येमध्ये प्रचंड घट होवून याचा आर्थिक फटका ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागेल.
वरील सर्व मुद्दे लक्षात घेवून मंत्री समितीमध्ये दि. १५ नोव्हेंबर २०२४ पासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याप्रमाणे दि. १५ नोव्हेंबर २०२४ पासून साखर कारखाने सुरू करावेत. यामध्ये विलंब होवू नये, अशी विनंती ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी साखर आयुक्तालय, महाराष्ट्र शासनास केल्याचे पत्रकार परिषदेत सांगीतले.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.