हंगाम लांबल्यास टोळ्या पळून जाण्याचा धोका : साखर कारखानदारांचा दावा

कोल्हापूर : जर साखर कारखाने वेळेत चालू झाले नाहीत, तर आलेल्या टोळ्यांच्या खावटी व चाऱ्याचा प्रश्न निर्माण होईल. शिवाय कर्नाटक राज्यात कारखाने सुरू झाल्याने काही टोळ्या पळून जाण्याची शक्यता आहे.  त्यांना दिलेल्या ॲडव्हान्सच्या रकमा बुडीत होण्याचा धोका आहे अशी भीती साखर कारखानदारांनी व्यक्त केली आहे. साखर कारखाने वेळेत सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन निवेदनाद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

याबाबतच्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्याचबरोबर साखर कारखान्यांच्या उत्पादन खर्चतही वाढ झाली आहे. तथापि, साखरेची आधारभूत किंमत (एमएसपी) सन २०१९ मध्ये रुपये ३१०० प्रतिक्विंटल ठरवलेली आहे. त्यावेळी उसाची एफआरपी रुपये २७५० प्रतिटन इतकी होती. त्यानंतर चार वेळा एफआरपीमध्ये वाढ होऊन ती या वर्षी प्रतिटन ३१५० रुपये आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात २ नोव्हेंबर रोजी झालेल्या मीटिंगमध्ये निवेदन करून कारखान्यांना जादा दर देणे शक्य नसल्याचे दाखवून दिलेले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील सरासरी साखरेचा विक्रीचा दर हा रुपये ३३०० ते ३३२५ पर्यंत गत आर्थिक वर्षात पडलेला आहे. ३६०० रुपये हा दर गेल्या वर्षी अखेरच्या टप्प्यात मिळाला. सध्या कर्नाटकातील कारखान्यांची वाहने सीमा भागात दाखल झाली आहेत. कारखान्याचे उसाचे गाळप हे तीन ते साडेतीन महिने चालेल. त्यामुळे उत्पादन खर्च वाढणार आहे. त्यामुळे कारखाने सुरू करण्यास सर्व संघटना, तसेच ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here