बुलंदशहर : सातत्याने बिघडणारे पर्यावरण पाहता पिकांचे अवशेष जाळण्याविरोधात सरकारने कडक भूमिका घेतली आहे. पाचट जाळणाऱ्या शेतकऱ्यांना आता ऊसाची नवी नोंदणी (सट्टा) बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच ऊस बिलेही जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सी. पी. सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानंतर जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. जिल्हा ऊस अधिकारी बृजेश पटेल यांनी सांगितले की, पिकांचे अवशेष जाळणे हा कायदेशीर गुन्हा आहे. अशी कृती करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याची तरतुद कायद्यात आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात यंदा ७४ हजार हेक्टरमध्ये ऊस पिक घेण्यात आले आहे, असे पटेल म्हणाले. बहुसंख्य शेतकरी शेतामध्ये पाचट जाळतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर जर कोणी शेतकरी पाचट जाळताना आढळला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल. यासोबतच त्यांचा उसाचा सट्टाही बंद केला जाईल. शेतकऱ्यांनी जेवढा ऊस कारखान्याला पाठवला असेल, ती रक्कम जप्त केली जाईल. हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर कृषी उप संचालक डिपिन कुमार यांनी पिक अवशेष जाळल्यास शेतकऱ्यांना सरकारी योजनेतून अनुदान मिळणाऱ्या आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.