कोल्हापूर : सरकारने आम्हाला राज्यातील कारखान्यांचा हिशोब तपासाला परवानगी द्यावी, आम्ही केवळ ४०० रुपये एफआरपी नव्हे तर साखरेचा उतारा दीड टक्क्यांनी वाढवून घोटाळा सिध्द करू, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.
आक्रोश पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी कागल येथाल शिवाजी चौकात ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्वच साखर कारखान्यांचे हिशोब तपासण्यासाठी सज्ज आहे, असेही शेट्टी म्हणाले. शेट्टी म्हणाले की, जोपर्यंत ४०० रुपयांचा हप्ता दिला जात नाही, तोपर्यंत एकाही साखर कारखान्याची ऊसतोड सुरू करू दिली जाणार नाही. यावर्षी साखर व उपपदार्थातून साखर कारखान्यांनी मुबलक पैसे मिळविले आहेत.
अनेक कारखान्यांनी प्रक्रिया खर्च अव्वाच्या सव्वा लावून ताळेबंद जुळवले आहेत. शिल्लक साखर व उपपदार्थाचे दर कमी दाखवून वाढलेला पैसा विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी मुरवला जाणार आहे. हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ७ नोव्हेंबर रोजी ऊस परिषदेत या हंगामातील ऊस दराचा निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
राजू शेट्टी म्हणाले की, साखर कारखानदार दुसऱ्या हप्त्याबाबत अडेलतट्टू भूमिका घेत आहेत. सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल केल्याशिवाय गाळपास परवानगी देऊ नये अशी आमची मागणी आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवशी पदयात्रा कागल येथे पोहचली. शाहू कारखाना प्रशासनाला ४०० रुपये दुसऱ्या हप्त्याबाबत निवेदन देण्यात आले.