नवी दिल्ली : शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी मदतीची अपेक्षा असते. देशात वास्तव्य करणारे कोणतेही शेतकरी कुटुंब सरकारने जारी केलेल्या निकषानुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत सहभागी होऊ शकते. पीएम किसान योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी तुम्हाला आपापल्या जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडे नावनोंदणी करावी लागते. अथवा पीएम किसान वेबाईटवर जावून याविषयीची प्रक्रिया पूर्ण करता येईल.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या योजनेच्या www.pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावून तुम्ही योजनेचा अर्ज भरुन तो ऑनलाइन जमा करू शकता. फॉर्म जमा झाल्यानंतर तो योजनेच्या स्टेट नोडल अधिकाऱ्यांकडे पाठवला जातो. तेथून त्याची पडताळणी केली जाते. त्यानंतरच योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. दिवाळीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेचा १२ वा हप्ता जमा केला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सरकारने १६,००० कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. जर तुम्ही योजनेचे लाभार्थी नसाल तर, पीएम किसान वेबसाईटवर जावून आधार कार्ड, बँक अकाउंट नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून योजनेची माहिती घेऊ शकता.