आयएमडी अलर्ट : या आठवड्यात उष्णतेच्या लाटेपासून मिळणार दिलासा, पावसाचीही शक्यता

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा वातावरण बदलले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) या महिन्याच्या अखेरपर्यंत देशात उष्णतेची लाट परतण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारपासून उत्तर-पश्चिम विभागात नव्याने पावसाची शक्यता आहे. आयएमडीच्या मतानुसार, रविवारी उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतात तापमान ३६ ते ३९ डिग्री सेल्सिअसदरम्यान राहील. तर पश्चिम हिमालय क्षेत्र वगळता देशभरात इतरत्र हे तापमान ३० ते ३५ डिग्री सेल्सिअसपर्यंत राहिल. पश्चिम हिमायल क्षेत्रात तापमान १५ ते २५ डिग्री सेल्सिअसदरम्यान असेल.

मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील सात दिवसात देशात उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार नाही असे पीटीआयने म्हटले आहे. २६ एप्रिलपासून हिमालयीन क्षेत्रात आणि २८ एप्रिलपासून उत्तर – पश्चिम मैदानी भागात पाऊस होण्याचे पुर्वानुमान आयएमडीने वर्तवले आहे. मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि मध्य प्रदेश तसेच छत्तीसगढच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत २५ एप्रिल ते २७ एप्रिल या काळात वादळी पाऊस आणि गारपीटही होवू शकते. याशिवाय, तामीळनाडू आणि केरळमध्ये पुढील तीन दिवस गडगडाटी पाऊस कोसळेल असे आयएमडीने म्हटले आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मंगळवारी किमान तापमान २०.४ डिग्री सेल्सिअस राहिले. आता २५ आणि २६ एप्रिल रोजी कोरडे हवामान राहील असे आयएमडीने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here