आम्ही भारत सरकारला बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवावेत असे आवाहन करणार आहोत, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ पियरे-ऑलिव्हियर गौरींचास यांनी म्हटले आहे. भारताच्या निर्यातबंदीचा जगावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारताने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे. भारताकडून जगातील १०० हून अधिक देशांमध्ये तांदूळ निर्यात केला जातो. सरकारच्या या निर्णयानंतर अमेरिकेतील सुपर मार्केटमध्ये तांदळाचे दर भरमसाठ वाढले आहेत. ग्राहकांना दुकानांबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. अमेरिकेतच नव्हे तर इतर देशांतही अशीच स्थिती आहे.
नोमुराने दिलेल्या माहितीनुसार, भारतातून जागतिक बाजारपेठेत निर्यात होणाऱ्या सर्व प्रकारच्या तांदूळांचा ४० टक्के वाटा आहे. त्यामध्ये बिगर बासमती तांदळाचा वाटा सुमारे २५ टक्के आहे. देशातून जगातील सुमारे १६० देशांमध्ये तांदूळ निर्यात केला जातो. अमेरिका, इटली, थायलंड, स्पेन आणि श्रीलंका हे भारताकडून सर्वाधिक तांदूळ आयात करणारे प्रमुख देश आहेत. याशिवाय इतर तांदूळ आयातदार देशांमध्ये सिंगापूर, फिलीपिन्स, हाँगकाँग, मलेशिया आदी देशांचा समावेश आहे. भारत २०१२ पासून तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. गैर बासमती तांदळाची निर्यात ४.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी आहे. भारत दर महिन्याला अमेरिकेला ६,००० टन बिगर बासमती तांदूळ पुरवतो. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून यापैकी ४००० टन तांदूळ पाठवला जातो.