कोल्हापूर : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यात (गोडसाखर) झालेल्या २९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी उर्वरित सर्व आरोपींना त्वरित अटक करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा सभासदांनी निवेदनाद्वारे पोलिसांना दिला आहे. याबाबत गडहिंग्लज पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज साखर कारखान्यात २९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी २१ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात तत्कालीन मुख्य लेखापाल बापूसाहेब रेडेकर वगळता इतरांना अटक झालेली नाही. अपहार झालेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद होऊन आठवडा लोटल्यानंतरही त्यांना अटक होत नाही, यामागील गौडबंगाल काय? कारखान्याच्या इतिहासात एवढा मोठा अपहार होऊनदेखील पोलिस प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसेल, तर ही दुर्दैवी व खेदाची बाब आहे. त्यामुळे संशयितांना त्वरित अटक करावी. निवेदनावर सिदगोंडा पाटील, कृष्णराव वाईंगडे, दत्ताजीराव देसाई, उदयसिंग पाटील, बाळकृष्ण होडगे, राकेश पाटील, विजयकुमार गुदग आदींच्या सह्या आहेत.