ऊस लागवडीचे वेळापत्रक राबविल्यास कारखान्यांच्या गाळप क्षमतेत वाढ:’व्हीएसआय’च्या शास्त्रज्ञांचा निष्कर्ष

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांना गळीत हंगामात किमान १६० दिवस ऊस पुरवठा होणे अपेक्षित असते. यासाठी हंगामनिहाय वाणांची लागवड करावी लागते. लागवडीचे वेळापत्रक बनविल्यास कारखान्याची गाळप कार्यक्षमता वाढते, असा निष्कर्ष वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) चे शास्त्रज्ञ डॉ. गणेश पवार, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. अशोक कडलग यांनी काढला आहे. एखाद्या राज्यातील २५०० टन गाळप प्रतिदिन गाळपक्षमता असलेला कारखाना १६० दिवस चालविण्यासाठी चार लाख टन ऊस गाळपास यायला हवा. यासाठी ऊस वाणांची निवड करताना गाळप हंगाम नियोजनाच्या सोयीसाठी लवकर, मध्यम आणि उशिरा या तीन तोडणी वर्गात विभागणी करावी, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तोडणी हंगाम नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू झाला, तर नोव्हेंबर दुसऱ्या पंधरवड्यापासून ते डिसेंबर अखेरपर्यंतची ऊस तोडणी ही लवकर तोडणी वर्गात मोडते. त्यानंतर जानेवारी ते मार्चपर्यंतची तोडणी मध्य तोडणी हंगाम वर्गात येते. मार्चनंतर म्हणजे एप्रिल, मेचा तोडणी हंगाम हा उशिरा तोडणी हंगाम वर्गात मोडतो. सुरू हंगामातील लागवडीस म्हणजेच १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी यामुळे रब्बी हंगामातील पिकामुळे उशीर होतो. तसेच समशीतोष्ण पट्ट्यामध्ये हिवाळ्यातील थंडीमुळे ऊस उगवणीस अडथळा निर्माण होत असतो, त्यामुळे लवकर पक्व होणाऱ्या व सुक्रोजचे प्रमाण जास्त असलेल्या वाणांची लागवड सुरू हंगामात करावी, असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे.

साखर कारखान्यांनी गटनिहाय खंडित/ टप्प्याटप्प्याने लागवड करून घेतल्यास तोडणी कार्यक्रमानुसार योग्य पक्वतेच्या उसाची उपलब्धता होईल. आठवड्याच्या फरकाने वाणनिहाय खंडित लागवड व त्या नोंदीनुसार टप्प्याटप्प्याने तोडणी यांचे नियोजन केल्यास कारखान्यांच्या कामामध्ये सुलभता येते. कारखाना कार्यक्षेत्रावर ५० टक्के क्षेत्र हे खोडव्याखालील असेल तर त्या क्षेत्रातून कारखान्याच्या गाळपाचे ४० टक्के गरज भागली जाईल. त्यामुळे राहिलेल्या ६० टक्के उसाची गरज ही नवीन लागवडीतून पूर्ण करावी लागेल. याचा अचूक अंदाज येईल, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

कारखान्यांनी नवीन वाण हे टप्प्याटप्प्याने वाढवत न्यावेत, ते अचानक सर्व कार्यक्षेत्रावर लागवड करू नयेत असा सल्लाही त्यांनी दिला आहे. लवकर पक्व होणारे कोसी ६७१, व्हीएसआय ४३४, एमएस १०००१ व को ९४०१२ तर मध्यम उशिरा पक्वता गटातील कोएम ०२६५, को ८६०३२, को ९२००५, व्हीएसआय ०८००५, को व्हीएसआय ०३१०२, को व्हीएसआय १८१२१ व पीडीएन १५०१२ आणि उशिरा पक्व होणारे कोएम ०२६५ असे वाण निवडावेत, असा सल्लाही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here