सांगलीत ऊस दराबाबत आज महत्वाची बैठक, तोडगा निघण्याची शक्यता

सांगली : ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.२७ डिसेंबर) कारखानदारांची दुसरी बैठक प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बोलावली आहे. बैठकीला कारखान्यांचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना निमंत्रित केले आहे. या बैठकीत ऊस दराबाबत तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची नजर या बैठकीकडे लागली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १६ रोजी कारखान्यांचे प्रतिनिधी, स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यामध्ये बैठक झाली होती. या बैठकीत ३ हजारपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी १०० रुपये आणि ३ हजार दर दिलेल्यांनी ५० रुपये तसेच यावर्षी एफआरपी अधिक १०० रुपये द्यावी, अशी मागणी माजी खासदार शेट्टी यांनी केली होती. मात्र, जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस दराचा हा कोल्हापूरचा पॅटर्न धुडकावला होता. त्यानंतर स्वाभिमानी संघटनेने साडेबारा टक्केपेक्षा जादा उतारा असणाऱ्या कारखान्यांनी पहिली उचल ३ हजार २५० आणि साडेबारापेक्षा कमी उतारा असलेल्यांनी ३ हजार २०० रुपये देण्याची मागणी केली. मात्र कारखानदार अनुक्रमे ३ हजार १५० आणि ३ हजार १०० रुपयांवर ठाम राहिले.

‘स्वाभिमानी’ने दिलेला नवा प्रस्तावही कारखानदारांनी अमान्य केला. त्यामुळे ऊस दरासाठी झालेली बैठक ही निष्फळ ठरली होती. बैठकीत ठोस तोडगा न निघाल्याने कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे २६ पर्यंत मुदत मागितली होती. ही मुदत संपली आहे. त्यामुळे दराची कोंडी फोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी पुन्हा बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली, स्वाभिमानीचे महेश खराडे, संदीप राजोबा यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here