मुंबई : चीनी मंडी
साखरेची घटलेली मागणी, अतिरिक्त साखर उत्पादन आणि घसरलेले दर यामुळे साखर उद्योग आर्थिक संकटात आहे. त्यातच येत्या ऊस गाळप हंगामातही उच्चांकी साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. अशी माहिती चिनीमंडी शी बोलताना सखर संघाचे कार्यकारी संचालक श्री संजय खताल यांनी दिली.
बैठकीला अन्न व नगरी पुरवठा मंत्रालयाचे अधिकारी तसेच देशातील सर्व खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्षांसह साखरेचे व्यापारी उपस्थित राहणार आहेत. उद्या (शनिवार, १३ ऑक्टोबर) दुपारी दोन वाजता मुंबईत ही बैठक होणार आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात ही बैठक होईल.
केंद्र सरकार साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. तरीही साखर उद्योगाला अपेक्षित दिलासा मिळालेला नाही. सध्याची साखर उद्योगाची स्थिती पाहता या उद्योगाच्या हिताचा विचार करणाऱ्या सर्वांना वेगळ्या दिशेने विचार करण्याची गरज आहे. सरकारने २०१८-१९च्या हंगामासासठी निर्यात कोटा ५० लाख टन जाहीर केला आहे. त्यामुळे अतिरिक्त साखर निर्यात होईल, अशी अपेक्षा आहे. तरीही या उपाय योजना पुरेशा वाटत नसल्याने या परिस्थितीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी उद्याची मुंबईतील बैठक निर्णायक ठरणार आहे.