नवी दिल्ली : सरत्या आठवड्यात गव्हाच्या पेरणी क्षेत्रात आणखी सुधारणा झाली आहे. हे क्षेत्र गेल्यावर्षीच्या लागवड क्षेत्रापर्यंत पोहोचले आहे. गेल्यावर्षी २९ डिसेंबरअखेर ३२.४५ दशलक्ष हेक्टर क्षेत्रात गहू लागवड केली गेली होती. यंदा गव्हाखालील क्षेत्र ३२.०५ दशलक्ष हेक्टर झाले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रात कमी पावसामुळे हरभरा या कडधान्य पिकाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे ८ टक्क्यांनी कमी आहे. थंड हवामान आणि धुक्याची स्थिती गव्हासाठी योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बहुतांश ठिकाणी गव्हाची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. आता पिकाच्या वाढीची योग्य कल्पना येण्यासाठी मार्च अखेरपर्यंतच्या हवामानाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) आपल्या ताज्या हवामान अपडेटमध्ये म्हटले आहे की, चार जानेवारीपर्यंत देशाच्या कोणत्याही भागात मोठी थंड लाट येण्याची शक्यता नाही. पण, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या विविध भागात ५ ते ११ जानेवारी यांदरम्यान थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.