नवी दिल्ली : चीनी मंडी
जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमधील प्रमुख साखर उत्पादक राज्यात साखर उत्पादन ४३ टक्क्यांनी घसरले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात ही घसरण झाली आहे. पावसामुळे उसाची प्रक्रिया थांबली असून, कारखाने मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उत्पादन करत आहेत, अशी माहिती ब्राझीलमधील युनिका या सर्वांत मोठ्या साखर उद्योग समूहाने दिली.
ब्राझीलमधील दक्षिण मध्य प्रांतात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ११ लाख दहा हजार लाख टन साखर उत्पादन झाले आहे. मागच्या दोन आठवड्यात १२ लाख ८० हजार लाख टन उत्पादन झाले होते. तर, गेल्या वर्षी याच काळात २० लाख टन साखर उत्पादन झाले होते, अशी माहिती युनिकाने दिली. उसाचे गाळप २५० लाख टनांपर्यंत घसरले आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यात २७० लाख टन गाळप झाले होते. तर गेल्या वर्षी याच काळात ३२० लाख टन गाळप झाले होते.
पावसामुळे उसाची तोड करणे अशक्य झाले असून, साखर कारखान्यांच्या कामकाजाचे पाच दिवस वाया गेले आहेत. न्यूयॉर्कच्या बाजारात साखरेला चांगला दर मिळाला, असला तरी साखर कारखान्यांकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. कारण, जैव इंधनातून इथेनॉलच्या माध्यमातून त्यांना चांगले रिटर्न्स मिळत असल्यामुळे कारखान्यांनी इथेनॉलवरच लक्ष केंद्रीत केले आहे. कारखान्यांनी उपलब्ध उसापैकी ६८ टक्के ऊस इथेनॉल उत्पादनसाठी, तर उर्वरीत ३२ टक्के ऊस साखर उत्पादनासाठी घेतला आहे.
युनिकाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत इथेनॉलचा दर ४२ टक्क्यांनी वाढला आहे. हंगामा संपण्यापूर्वीच १५ कारखान्यांनी आपले काम थांबवले असून, या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात ६४ कारखाने आपले काम थांबवण्याच्या तयारीत आहेत.