पुणे : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याअंतर्गत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्याकरिता अपघात विमादेखील प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र विमा योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी अवधी लागत असल्याने सद्य:स्थितीत अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीय वारसांना तातडीने रुपये ५ लाखांची मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने महामंडळाकडे शासनाने ३ कोटी ६७ लाखांचा निधी वितरित केला आहे. राज्यातील १० लाख ऊसतोड कामगारांना या निर्णयाने लाभ होणार आहे.
३ कोटी ६७ लाखांचा निधीचे वितरण….
यासंदर्भात महामंडळाकडे राज्यातून प्राप्त झालेल्या ६७ प्रकरणांमध्ये प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे एकूण ३ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी संबंधित जिल्ह्यांना ऊसतोड कामगार कल्याण वितरित करण्यात आला आहे. या निधीतून लाभार्थ्यांना त्या-त्या जिल्ह्याचे मंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते त्याबाबतचा धनादेश लवकरच वारसांना वाटप करण्यात येणार आहे.
…अशी होणार कागदपत्रांची पडताळणी, छाननी
याबाबत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा अपघाती मृत्यू झाला आहे अशा व्यक्तींच्या अपघाती मृत्युबाबत संबंधित जिल्हाधिकारी, प्रादेशिक उपायुक्त, सहायक आयुक्त गोपीनाथ मंड समाज कल्याण यांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी छाननी करून पात्र ठरलेल्या ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रकमेचा धनादेश वाटप करण्यात यावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
अपघाताचे स्वरूप काय ?
या अपघाताच्या स्वरूपांमध्ये रस्ते, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, उंचीवरून पडून झालेला अपघात, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणाने झालेली विषबाधा, सर्पदंश, विंचूदंश, जनावराने चावा घेणे, रेबीज, कोणत्याही प्राण्याने जखमी केल्यामुळे अपंगत्व येणे किंवा मृत्यू येणे, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, दंगलीतील अपंगत्व अथवा मृत्यू, खून, आगीमुळे झालेला अपघात व अन्य कोणताही अपघात याचा समावेश करण्यात आला आहे.