छत्रपती संभाजीनगर : यंदा गतवर्षीपेक्षा उसाचे गाळप कमी होत असून सात साखर कारखाने कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याने बंद झाले आहेत. आतापर्यंत ८३ लाख ६८ हजार मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. आणखी १२ लाख मेट्रिक टन गाळप होण्याची शक्यता आहे. गतवर्षी १ कोटी ९ लाख टनाचे गाळप झाले होते. यंदा अपुऱ्या पावसाचा फटका उसाला बसला आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील हे एकूण २७ कारखाने असून त्यापैकी २२ कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम घेतला. काही कारखान्यांचा हंगाम मार्च अखेर वा जास्तीत जास्त १५ एप्रिलपर्यंत चालेल. संत एकनाथ, सिद्धेश्वर, शरद, बारामती ॲग्रो, छत्रपती संभाजीराजे, मुक्तेश्वर शुगर या साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. भोकरदनच्या रामेश्वरचे गाळप ८० हजार २३३ मेट्रिक टनावर थांबले आहे.
अंबडचा अंकुशराव टोपे साखर कारखाना १५ एप्रिलपर्यंत चालेल. तीर्थपुरीचा सागर साखर कारखानाही १५ एप्रिलपर्यंत चालेल. या दोन्ही कारखान्यांनी आतापर्यंत अनुक्रमे ७ लाख ९० हजार मेट्रिक टन व ३ लाख ५५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. देवीदहेगावचा समृद्धी साखर कारखाना १५ एप्रिलपर्यंत चालेल. परतूरचा बागेश्वरी कारखानाही ३१ मार्चपर्यंत चालेल. जयभवानी साखर कारखाना ४ लाख ९६ हजार मेट्रिक टन ऊस गाळपानंतर आता बंद झाला आहे. राजुरीचा गजानन साखर कारखानाही १ लाख १३ हजार ६९६ मेट्रिक टननंतर आता बंद झाला आहे. माजलगाव कारखान्याचे गाळप ३१ मार्चपर्यंत एनएसआय कारखानाही १५ मार्चपर्यंत चालेल. केजचा येडेश्वरी कारखाना ३१ मार्चपर्यंत, केजचाच विखे पाटील कारखाना १० मार्चपर्यंत सुरू राहील.