कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस दर आंदोलनामुळे गाळप हंगाम जवळपास ठप्प झाला आहे. या आंदोलनाचे केंद्र शिरोळ तालुकाच आहे. एकीकडे ऊस दरासाठी आंदोलन सुरु असताना आता साखर कारखाने लवकर सुरु करा, म्हणून शिरोळ तालुक्यातूनच आंदोलनाचा बिगुल वाजला आहे. शासनाने वेळीच्या हस्तक्षेप करून लांबत चाललेला हंगाम तत्काळ सुरू करावा, या मागणीसाठी शिरोळ तहसील कार्यालयासमोर आजपासून (21 नोव्हेंबर) ठिय्या करण्यात येत असल्याची माहिती शिरोळ तालुका ऊस उत्पादक कृती समितीचे अध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डांगे म्हणाले, आमचा ऊस तुटला पाहिजे, कामगारांना काम मिळाले पाहिजे. वाहनधारक बसून आहेत. त्यासाठी आम्ही सर्व लोक मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत. शासनाने व कारखानदारांनी याची दखल घेऊन ताबडतोब तोडगा काढावा आणि गाळप हंगाम तातडीने सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या विविध ऊस दर आंदोलनामध्ये अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याने शेतकरी, वाहनधारक, ऊस तोडणी कामगार, शेतमजूर आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावेळी दिलीप माणगावे, कृती समितीचे सदस्य अन्वर जमादार, मुकुंद गावडे आदी उपस्थित होते