कोल्हापुरात आंदोलनाची दाहकता वाढली: ऊसतोडी पाडल्या बंद, ट्रॅक्टरच्या टायरमधील हवा सोडली

कोल्हापूर : गत गळीत हंगामातील उसाला दुसरा हप्ता ४००रूपये व राज्यातील सर्व साखर कारखान्याचे वजनकाटे डिजिटल करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांची २२ दिवसांची ५२२ किलोमीटरची आक्रोश पदयात्रा सुरु आहे. दुसरीकडे आंदोलन अंकुश, रयत क्रांती संघटना, रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना यांनी आपापल्या पद्धतीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा आंदोलनचे केंद्र बनले असून दिवसेंदिवस आंदोलनाची दाहकता वाढू लागली आहे.

शुक्रवारी दानवाड (ता. शिरोळ) येथे कर्नाटकातून आलेले ऊस ट्रॅक्टर संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटना व आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरले. टाकळीवाडी येथे घोसरवाडमार्गे सदलगा परिसरातून आलेल्या ऊस ट्रॅक्टरच्या टायरमधील हवा सोडण्यात आली. यावेळी कारखानदार समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. ऊस दराचा निकाल अद्याप न लागल्याने आणि कारखाने सुरू झाल्याने कारखानदारांनी कर्नाटक राज्यातील ऊस गनिमी काव्याने बंदोबस्तात आणत असताना संघर्ष सुरू झाला. ऊस दराचा निर्णय झाल्याशिवाय ऊसतोड करू नये, असा दोन्ही संघटनांनी इशारा दिला आहे. तरीही ऊस वाहतूक सुरु असल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. दरम्यान, शेतात ऊस वाळवायचा की वेळेत ऊस पाठवून वजन वाचवायचे, अशी शेतकऱ्यांची संभ्रमावस्था झाली आहे.

मुरगूड येथे ऊसतोडी पाडल्या बंद…

कागल तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बानगे परिसरात प्रत्यक्ष उसाच्या फडात जाऊन कार्यकर्ते ऊसतोड बंद पाडत आहेत. मुरगूड येथेही शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या दराचा विचार न करता साखर कारखाने सुरू केले जात आहेत, याचा निषेध म्हणून येथील ऊसतोडी शेतकऱ्यानीच बंद पाडल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाजतगाजत उसाच्या फडात जात निषेध करून शेतकऱ्यांना आपले कांडेही न तोडण्याचे आवाहन केले. शुक्रवारी मुरगूड येथे ऊस तोडीसाठी मजूर आल्याचे समजताच शेतकरी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड बंद पाडली.

कबनूर ग्रामपंचायतीचा दुसऱ्या हप्त्यासाठी ठराव…

शेतकऱ्यांना मागील गळीत हंगामातील एफआरपीचा दुसरा हप्ता ४०० रुपये व चालू वर्षी तुटून जाणाऱ्या उसाचा दर निश्चित झाल्याशिवाय गावातील शेतकऱ्यांनी ऊस तोड देऊ नये, असा ठराव ३१ ऑक्टोबरच्या मासिक सभेत केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परंतु, ताराराणी गटाच्या वतीने असा ठरावच झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. एका कारखानदाराला या ठरावाची कुणकुण लागताच त्याने सरपंच सौ. शोभा पोवार व ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांचा दूरध्वनी वरून खरपूस समाचार घेत चांगलीच कानउघाडणी केली. जर हा ठराव रद्द नाही झाला तर नेत्याचा रोष ओढवून घ्यावा लागेल आणि ठराव रद्द केला तर ग्रामपंचायतीला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here