कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस हंगामाने गती घेतली असून त्यामध्ये यंत्राने होणाऱ्या तोडणीचा मोठा वाटा असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर ऊस तोडी सुरू आहेत. ऊस तोड मजुरांच्या टोळ्या उपलब्ध झाल्या नसल्याने यंत्राच्या माध्यमातून ऊस तोडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. गेल्या काही वर्षांत ऊस टोळ्यांकडून वाहन धारकांची होणारी फसवणूक, कारखान्याची होणारी अडचण लक्षात घेऊन कारखानदारांनी देखील यंत्राच्या साह्याने ऊस तोडीला प्राधान्य दिले आहे.
विधानसभा निवडणुकीमुळे हा हंगाम जवळपास महिनाभर लांबल्यामुळे उसाला तुरे फुटले आहेत. परिणामी, उसाचे वजनदेखील घटले आहे. अलीकडच्या काळात यंत्राच्या साह्याने उसाची तोड होत असल्यामुळे ऊस पिकणाऱ्या पशुपालकांवर हिरव्या चाऱ्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे. मोठ्या प्रमाणावर ऊस तोड होत असताना चाऱ्याची मात्र टंचाई जाणवत आहे.
यंत्राच्या साह्याने दिवसभरात मोठ्या प्रमाणावर उसाची तोड होते. मात्र जनावरांना हिरवा चारा मिळू शकत नाही. ज्या ठिकाणी ऊसतोड मजूर आहेत त्या ठिकाणी चांगले वाढे मिळत नाही. चांगले वाढे मिळाले तर ते परवडणाऱ्या दरात मिळत नाही, अशा अनेक समस्या सध्या पशु मालकांना भेडसावत आहेत. सध्या कारखानदारांकडून आडसाली उसाची प्राधान्याने तोड सुरू आहे. खोडवा उसाची तोड आणखी दीड ते दोन महिने तरी शेतकऱ्यांना मिळणार नाही.