कोल्हापूर : मागील हंगामातील ४०० रुपये आणि चालू हंगामातील ३,५०० रुपये दर यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन आणि काही दिवसांपूर्वी झालेला जोरदार पाऊस यांनी साखर कारखान्यांसमोरील अडचणी वाढवल्या आहेत. त्यामुळे गळीत हंगाम सुरू होवून दहा दिवस उलटले तरी जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने ऊस तोडणी सुरू झालेली नाही. पश्चिमेकडील काही कारखान्यांमध्ये ऊस तोडणी व गाळप सुरू असले तरी ते अत्यंत संथ गतीने आहे. पूर्व भागातील हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील कारखान्यांचे कामकाज ठप्प आहे.
काही तालुक्यात ऊस तोडणीची बिकट स्थिती निर्माण झाली आहे. दराचा तोडगा न निघाल्याने या भागातील ऊस तोडणी बंद आहे. तोडणी कामगार बसून आहेत. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काम नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. तर गेल्या दोन दिवसांत जिल्ह्याला पावसाने झोडपले. त्यामुळे पश्चिमेकडील सुरू असलेल्या कारखान्यांची ऊस तोडणी खोळंबली आहे. त्यामुळे हंगामाची सुरुवात अडखळतच झाली आहे.
हंगाम सुरू होऊन दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी अनेक कारखान्याचे गाळप काही हजार टन झाली नाही. ऊस तोडणीला स्वाभिमानीकडून विरोध होत असल्याने शेतकरीही धास्तावले आहेत. कारखान्याकडे निघालेला ऊस अडवून उसाचे नुकसान करत असल्याने अनेक कारखानदारांनी तोडणी थांबण्याची भूमिका घेतली आहे.