कोल्हापूर बाजारात गुळाच्या दरासह मागणीही घटली, क्विंटलला ४२०० ते ४५०० रुपये भाव

कोल्हापूर : सध्या उसाचा हंगाम पूर्णपणे संपला आहे. गुळाची आवक रोडावल्याने येथील बाजार समितीत एक दिवसाआड गुळाचे सौदे होत आहेत. गुळाच्या दरासह उन्हाच्या तडाख्याने मागणीही घटली आहे. सध्या येथील बाजार समितीत गुळाचे दर क्विंटलला ४२०० ते ४५०० रुपये आहेत. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत गुळाच्या दरात १०० ते २०० रुपयांनी घट झाली आहे. सध्या देशभरात उष्णता वाढत आहे. गुळाची सर्वाधिक मागणी असणाऱ्या गुजरातमध्ये याचा परिणाम अधिक जाणवत आहे. तिथे सातत्याने ४० अंश सेल्सिअसवर तापमान असल्याने बाजारपेठांतील उलाढाल थंडावली आहे.

यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस लागवड कमी असल्याने गुऱ्हाळासाठी ऊस मिळवणे अडचणीचे बनत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुऱ्हाळघरे अत्यल्प सुरू झाली होती. पाडव्यानंतर गुळाची आवक मंदावली. दररोज सौदे काढण्याइतका गूळ येत नसल्याने एक दिवसाआड सौदे सुरू करण्यात आले आहेत. बाजार समितीत एक दिवसाआड १५ ते २० गाड्या गुळाची आवक होत आहे. बहुतांश गूळ कोल्हापूर शहराच्या आसपासच्या भागांतून येत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. कर्नाटकातूनही गुळाची आवक गुजरातच्या बाजारपेठेत कमी जात आहे. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने व धार्मिक कार्यक्रमही रोडावल्याने गुळाच्या मागणीवर परिणाम झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here