कोल्हापुरात गुळाची आवक वाढली, दर मात्र स्थिरच

कोल्हापूर : जिल्ह्यातील गूळ हंगामास आता गती आली आहे. हवामान चांगले असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवकही चांगली होत आहे. दरात उच्चांकी वाढ नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. दररोज गुळाची नऊ ते दहा हजार रव्यांची आवक होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी गुळाला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात गुऱ्हाळ घरांची संख्या घटली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी आदींसह अन्य तालुक्यात हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच गुऱ्हाळ घरे शिल्लक आहेत.

गुळाची नियमित आवक होत असली, तरी गुजरात भागांमध्ये मागणी नसल्याने दर मात्र कमी असल्याचे चित्र आहे. गुळास क्विंटलला किमान ३५०० ते कमाल ४५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. सरासरी दर ३८०० ४००० रुपयांच्या दरम्यान आहे. दीपावलीपूर्वी गुळाला ४००० ते ४८०० रुपये प्रती क्विंटल दर होता. दीपावली पाडव्याच्या सौद्यामध्ये किमान ४३०० रुपये ते कमाल ५६०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला होता. दर चांगला असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुळाचे उत्पादन सुरू झाले. दीपावलीनंतर मात्र गुळाचे दर हळूहळू कमी होत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here