कोल्हापूर : साखर आयुक्तालयाने प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 20 डिसेंबर 2023 अखेर 332.27 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. सध्या राज्यात गाळप पूर्ण क्षमतेने सुरु असून 8.6 च्या सरासरी उताऱ्याने 285.88 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात 192 साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला असून त्यात 94 सहकारी आणि 98 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे.
गाळपामध्ये पुणे विभागाने आघाडी घेतली असून 29 साखर कारखान्यांनी 75.39 लाख टन उसाचे गाळप करून 66.57 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी उतारा 8.83 इतका आहे. 72.66 लाख टन ऊस गाळपासह सोलापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. 7.93 सरासरी उताऱ्यासह सोलापूर विभागात 57.6 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कोल्हापूर विभागात 37 साखर कारखान्यांनी 68.19 लाख टन उसाचे गाळप आणि 66.73 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कोल्हापूर जिल्हा 9.79 सरासरी उताऱ्यासह राज्यात आघाडीवर आहे.