महाराष्ट्रात साखर उतारा घटला, एफआरपीचे गणित बिघडले, व्हीएसआय घेणार आढावा

कोल्हापूर : यंदाच्या ऊस गळीत हंगामाची नुकतीच समाप्ती झाली. या हंगामात राज्यातील १९० साखर कारखान्यांनी सहभाग नोंदवला. राज्यात १०१२ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. मात्र, सरासरी साखर उतारा अर्धा ते पाव टक्क्याने घटला आहे. परिणामी प्रती टन ३१० रुपयांचा फरक पडणार आहे.

इथेनॉलसह नैसर्गिक कारणांमुळे साखर उतारा घटल्याचा अंदाज साखर उद्योगातील तज्ज्ञांचा आहे. त्यामुळे आता एफआरपीचा आढावा घेतला जाणार आहे. जर साखर उताऱ्यात एक टक्क्याचा फरक पडला तर शेतकऱ्यांना प्रती टन ३१० रुपये एफआरपी कमी मिळते. शेतकऱ्यांचा तोटा होऊ नये म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) या स्थितीचा अभ्यास करीत आहे. त्यानंतर इथेनॉल उत्पादनामुळे कमी झालेली एफआरपीची रक्कम शेतकऱ्याला मिळावी याची शिफारस केली जाणार आहे.

दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यासह यंदा विदर्भ, मराठवाड्यातील चांगले पर्जन्यमान, उसासाठी पोषक वातावरण यामुळे उसाचे विक्रमी उत्पादन झाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ४३ जादा साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग नोंदवला. त्यामुळे विक्रमी ऊस गाळप झाले आहे.

मात्र, यंदा सरासरी साखर उतारा १०.५० टक्क्यांवर आला. यापूर्वी गेली दहा वर्षे हा सरासरी उतारा ११.३० टक्क्यांपेक्षा अधिक होतो. राज्यात सर्वात कमी उतारा असलेल्या दहा कारखान्यांपैकी सहा कारखाने खासगी तसेच इथेनॉल उत्पादन करणारे आहेत. इथेनॉल निर्मिती आणि कमी कालावधीत तोडणी झालेले पिक आल्यामुळे साखर उताऱ्यात घट झाली असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मोहोळ तालुक्यातील जाकरया शुगरचा उतारा राज्यात सर्वात कमी म्हणजे ५.५७ टक्के आहे.

घटलेल्या साखर उताऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी इथेनॉल उत्पादनाबाबत आढावा घेतला जाणार असल्याचे साखर उद्योगातील अभ्यासक पी. जी मेढे यांनी सांगितले. ते म्हणाले, साधारणतः ६०० लिटर इथेनॉलसाठी एक टन साखर वापरली जाते असे गृहीत धरून साखर उतारा वाढवावा लागेल. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून ही वाढ प्रमाणिक करून घेऊन ती रक्कम अंतीम एफआरपीत वाढवणे ही प्रक्रिया साखर कारखान्यांना करावी लागेल. तसेच झाले तर वाढीव एफआरपीचे पैसे शेतकऱ्याला मिळतील आणि साखर उतारा घटल्याचा तोटा होणार नाही. ही प्रक्रिया पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी होणे अपेक्षित आहे.

इथेनॉल उत्पादनात वाढ
साखर आयुक्तांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील स्वतंत्रपणे इथेनॉल निर्मिती करणारे ४५ कारखाने आणि इतर असे एकूण ११७ कारखाने २०२०-२१ मध्ये एक कोटी ६४ लाख ११ हजार लिटर इथेनॉल निर्मिती करतील. तर २०२१-२२ मध्ये १४५ कारखाने दोन कोटी २० लाख लिटर क्षमतेने इथेनॉल निर्मिती करू शकतात. राज्यात १९० साखर कारखान्यांची गाळप क्षमता ७.२८ लाख टन होती. त्यात ०.७६ लाख टनाची वाढ होऊन २०२१-२२ या हंगामात ही क्षमता ८.०५ लाख टन होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here