मुरादाबाद : शेतकऱ्यांना ऊस बिले देण्याबाबत साखर कारखाने गंभीर नाहीत. त्यामुळे उप जिल्हाधिकारी सुरेंद्र कुमार सिंह यांनी कारखान्यांच्या प्रमुखांची बैठक घेतली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर उसाची थकबाकी देण्याबाबत निर्देश दिले. पैसे न देणाऱ्या कारखान्यांविरोधात नोटीस बजावली जाईल असे सांगितले
उप जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात ऊस थकबाकीचा आढावा घेतला. यावेळी कारखाना प्रतिनिधींसह जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अजय सिंह उपस्थित होते. या दरम्यान कारखान्यांनी ६७.५१ टक्के ऊस बिले दिली असल्याचे दिसून आले. यामध्ये सर्वाधिक ८७.८२ टक्के पैसे रानीनांगल कारखान्याने दिले आहेत. दिवाण शुगर मिल अगवानपूरने सर्वात कमी ४८.४२ टक्के पैसे दिले आहेत. बिलारी कारखान्याने ६५.४७ टक्के आणि बेलवाडा कारखान्याने ६४.०३ टक्के पैसे दिले आहेत असे आढळून आले.
याबाबत उप जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. शेतकऱ्यांना पैसे लवकर देण्याचे आदेश दिले. उशीर करणाऱ्या कारखान्यांविरोधात वसुलीची नोटीस बजावली जाईल असे त्यांनी सांगितले.
दरम्यान ऊस थकबाकीबाबत शेतकऱ्यांनीही आंदोलन केले होते. भारतीय किसान युनियनने तातडीने ऊस बिले देण्याची मागणी केली आहे.