पाकिस्तान आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेच्या दुष्टचक्रात खूप खोलवर अडकला आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी शहबाज शरीफ सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदतीची याचना केली आहे. संपत चाललेल्या विदेशी चलनसाठ्यामुळे गरजेच्या वस्तू आयात करण्यासही पाकिस्तान सक्षम नाही. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आट्यापासून ते कांद्यापर्यंत सर्व वस्तूंची टंचाई आहे आणि याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने आयएमएफकडे १.१ बिलियन डॉलरचा निधी मागितला आहे. आयएमएफने अद्याप बेल आऊट पॅकेजला मंजुरी दिलेली नाही. यादरम्यान पाकिस्तानी लोकांसमोर दररोज कोणती ना कोणती अडचण येत आहे. कधी सरकार वीज दरवाढ करीत आहे. तर कधी पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले जातात. पाकिस्तानमधील महागाईच्या दराने उच्चांक मोडला आहे. फेब्रुवारीत ३१.५ टक्के उच्चांकी महागाई दर होता. गेल्या ५० वर्षात हा सर्वाधिक दर आहे. कांद्याचा दर १५० रुपयांवर गेला आहे. ९ मार्च रोजी कांदा १५७ रुपये किलो होता. एक वर्षापूर्वी, १० मार्च २०२२ रोजी त्याचा दर ३९ रुपये होता. वर्षभरात कांदा ३०५ टक्के वाढला असून २० किलो गव्हाचा आटा १७७५ रुपयांना मिळत आहे. एक वर्षापूर्वी हा आटा ११६० रुपयांना म्हणजे ५३.१ टक्के कमी दराने मिळत होता.