इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये तीन वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये सुरू झालेली अन्नधान्याच्या दरवाढीचे सत्र २०२१ मध्येही सुरूच आहे. वनस्पती तुपाच्या दरात गेल्या तीन वर्षांमध्ये सलग २७ टक्क्यांची वाढ झाली. ऑक्टोबर २०१८पासून खाद्यतेलाच्या किंमती २३ टक्के, साखरेचा दर २२ टक्के आणि डाळींच्या दरात २१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, २०१८नंतर सर्व प्रकारच्या पिठाची किंमत १५ टक्क्यांनी वाढली आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या दोन वर्षात फक्त दोन महिन्याचा अपवाद वगळता अन्नधान्याच्या महागाईचा दर दोन अंकी राहिला. याबाबत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉलिसी इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक आबिद कय्युम सुलेरी यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने सुरू असलेल्या इंधन दरवाढीमुळे महागाईचा दर वाढला आहे. गेल्या तीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे १४ टक्के आणि ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर विजेच्या दरातही १६ टक्के प्रती युनिट वाढ दिसून आली आहे.