सांगली : आमदार जयंत पाटील यांच्या दबावामुळे सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी पहिली उचल कमी जाहीर केली आहे. ३१०० रुपयांची उचल दिल्याने जिल्ह्यातील कारखान्यांना ९६ कोटी ४६ लाख रुपयांचा फायदा होईल, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांनी इस्लामपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दर द्यावा, अन्यथा शुक्रवारी (१ डिसेंबर) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने साखराळे येथील राजारामबापू कारखान्यावर उस काटा बंद आंदोलन करून जिल्ह्यातील ऊस वाहतूक रोखू, असा इशारा त्यांनी दिला.
माजी खासदार शेट्टी म्हणाले की, कमी दर दिल्याने राजारामबापू कारखान्याचा ३६ कोटी १९ लाख, सोनहिरा कारखान्याचा २४ कोटी ९१ लाख रुपयांचा फायदा होणार आहे. दत्त-इंडिया ४ कोटी १८ लाख, विश्वास कारखाना ५ कोटी २८ लाख, क्रांती कारखाना १८ कोटी ८६ लाख, दालमिया ७ कोटी ३ लाख रूपये अशी सुमारे ९६ कोटी ४६ लाख रुपये कारखानदारांच्या घशात जात आहेत. आ. जयंत पाटील यांचा दबाव याला कारणीभूत आहे.शेट्टी म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कारखानदारांचा फॉर्म्युला आम्हाला मान्य नाही. सोमवारपासूनच आम्ही आंदोलन तीव्र करू. दर शेतकरी जादा दर देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पाठवणार असतील, तर स्वाभिमानीचे कार्यकर्ते उस उत्पादकांना सहकार्य करतील.
ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही ३८ दिवस संघर्ष केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा प्रशासन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून फॉर्म्युला तयार केला. गेल्यावर्षीच्या उसाला अनुक्रमे ५० व १०० रुपये द्यायचे ठरले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्यावर्षीच्या उसाचे ११० कोटी, यंदा उसाला १८० कोटी रुपये जादा मिळणार आहेत. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी कोणालाही विश्वासात न घेता कमी पहिली उचल जाहीर केली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपट मोरे, भागवत जाधव, संदीप राजोबा, संजय बेले, आप्पासाहेब पाटील, जगन्नाथ भोसले, अॅड. एस. यू. संदे आदी उपस्थित होते.