सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी पुकारलेले आंदोलन तीव्र झाले आहे. डिग्रज पुलावर सोमवारी रात्री शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी दत्त इंडिया सांगली व सर्वोदय कारंदवाडी कारखान्याकडे जाणारी तीस ते चाळीस ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवली. पुलावर जवळपास दोन तास ऊस वाहतूक रोखली. शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा, कुमार पाटील, सुनील फराटे, महादेव सिसाळ, अजय लांडे, विनायक जाधव, अजित काशीद यांसह कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनासमोर ठिय्या आंदोलन केले. मात्र, रात्री पुन्हा अनेक ट्रॅक्टर या मार्गावर येताच पुन्हा आंदोलन करण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी, ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालक, कारखान्याचे कर्मचारी आदींच्यात चर्चा झाली. उद्यापासून ऊसतोड पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. मात्र, रात्री नऊ वाजल्यानंतर पुन्हा अनेक वाहने डिग्रज पुलावर आली. त्यानंतर ही वाहने अडवण्यात आली. रात्रीपासून जवळपास १०० ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवण्यात आले असून वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा म्हणाले की, शेतकऱ्यांनीही तोडी घेवू नयेत. थोडी कळ सोसावी. डिग्रज पुलावरून कोणत्याही साखर कारखान्याला ऊस सोडणार नाही. वाहन मालकांनी दक्षता घ्यावी. वाहन मालकांनी ऊसाची वाहने भरून जबरदस्तीने वाहतूक केली, तर जशास तसे उत्तर देऊ. कारखानदारांनी पुन्हा वसगडे प्रकरणाची वेळ येवू देवू नये. शासनानेही याचे गांभीर्य लक्षात घ्यावं. दरम्यान, आता ‘आर या पार’ची लढाई करण्याचा निर्धार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी केला. शेतकरी कार्यकर्ते अजित काशिद म्हणाले की, कारखानदारांनी ऊसदराचा प्रश्न मिटवला पाहिजे. याच बरोबर ऊस तोड बंद राहणार असल्याने मजूर बसून राहणार आहेत. शेतकऱ्यांनी ऊस तोड घेवू नये.