सांगलीत ‘दालमिया भारत’चा सर्वाधिक प्रतिटन ९०५.७१ रुपये तोडणी- वाहतूक खर्च

सांगली : जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी व वाहतूक खर्चाचे दर निश्चित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रतिटन ९०५.७१ रुपये दर दालमिया भारत शुगर आणि सर्वांत कमी ६५६.२८ रुपये हुतात्मा कारखान्याचा आहे. साखर आयुक्तालयाने २०२३-२४च्या गळीत हंगामाचा जिल्ह्यातील कारखानानिहाय ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनाही कमी ऊस तोडणी व वाहतूक खर्च असणाऱ्या कारखान्याला ऊस गाळपासाठी पाठवता येणार आहे.

… असा ठरतो तोडणी, वाहतूक खर्च

कारखान्यांच्या परिघात उसाचे क्षेत्र जास्त असेल, तर वाहूतक खर्च कमी येतो. मुळात ऊसतोडणी खर्चात फारसा फरक येत नाही. मात्र, वाहतूक खर्चात कारखानानिहाय जास्त फरक येतो. जिल्ह्यातील वाळवा, मिरज, पलूस येथे उसाचे क्षेत्र जास्त आहे. कारखान्यांच्या पाच ते दहा किलोमीटर परिघातीलच ऊस अनेक कारखान्यांना संपत नाही. त्यामुळे या जिल्ह्यांत वजावट कमी असते. याच्या उलट दालमिया शुगर, रायगाव शुगर, सदगुरु श्री श्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस कमी आहे. या कारखान्यांना पुरेसा ऊस मिळण्यासाठी ५० किलोमीटर अंतरावरून ऊस आणावा लागत असल्यामुळे त्यांचा वाहतुकीवर जास्त खर्च होत असल्याचे अधिका-यांचे मत आहे.शेतकरी संघटनांच्या मते ऊस वाहतूक आणि तोडणीचा खर्च २५ किलोमीटरच्या आतील कारखान्यांसाठी एक आणि उर्वरित ५० किलो मीटरपर्यंतच्या कारखान्यांसाठी एक दर जाहीर करण्याची गरज आहे. असे झाले तरच शेतक-यांना फायदा होणार आहे.

…असा बसतो शेतकऱ्यांना भुर्दंड

एका कारखान्याने तुंग (ता. मिरज) पेथून ऊस वाहतूक केल्यानंतर वाहतूकदारास ऊस तोडणी व वाहतुकीचा खर्च प्रतिटन ५०० रुपये दिला आहे. प्रत्यक्षात कारखान्याने शेतकऱ्याच्या बिलामधून ऊस तोडणी व वाहतुकीचा खर्च प्रतिटन ०५५.९१ रुपये कपात केली आहे. जवळपास २५५.९१ रुपये प्रतिटन शेतकऱ्याचे नुकसान झाले. म्हणूनच कारखानदारांकडून शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी टप्पा वाहतूक झाली पाहिजे. पहिल्या २५ किलोमीटरसाठी एक आणि २५ किलोमीटरच्या पुढील ऊस वाहतुकीसाठी वेगळा दर निश्चित झाला पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

कारखान्यांचे तोडणी व वाहतुकीचे दर (प्रतिटन) :

कारखाना निहाय ऊस तोडणी व वाहतूक खर्च असा : दालमिया भारत शुगर – 905.71 , रायगाव साखर -886.80, सद्गुरु श्री श्री – 809.13, राजारामबापू तिपेहळ्ळी – 791.21, राजारामबापू कारंदवाडी – 734.19, राजारामबापू साखराळे – 733.47, राजारामबापू वाटेगाव- 713.09, दत्त भारत – 755.91, श्रीपती शुगर डफळापूर – 745.95, उदगिरी साखर बामणी – 728.89, मोहनराव शिंदे आरग – 722.09, विश्वासराव नाईक – 717.11, सोनहिरा – वांगी – 707.52 , क्रांती-कुंडल – 697.25

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here