सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या गूळ सौद्यात चिक्की गुळाला प्रती क्विंटल ५,१०० रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. आडत दुकानदार अमरसिंह देसाई यांचे दुकानांमधील गुळ सौद्यामध्ये निडगंदी (ता. रायबाग, कर्नाटक) येथील शेतकरी सुरेश मारुती पुणेकर यांनी हा चिक्की गूळ सौद्यासाठी आणला होता. अर्धा किलो पॅकिंगमधील चिक्की गुळास ५१०० रुपये इतका उच्चांकी दर मिळाला.
सत्यविजय सेल्सने हा गूळ खरेदी केली. गुळाच्या ढेपीला आणि गुळ रव्याला प्रती क्विंटल ३८०० ते ४५०० रुपये असा दर मिळाला. सौद्यावेळी बाजार समितीचे संचालक कडप्पा वारद, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, सूर्यकांत आडके, दर्याप्पा बिळगे यांच्यासह आडते, व्यापारी, शेतकरी, खरेदीदार उपस्थित होते. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त गुळ विक्रीसाठी सौद्यात आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुजय नाना, अशोकराव शिंदे यांनी केले.