नवी दिल्ली : देशाच्या निर्यातीमध्ये गेल्या महिन्यात घसरण झाली असून आयात वाढली आहे. व्यापार तुटीवर याचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. भारताची निर्यात गेल्यावर्षीच्या, सप्टेंबर २०२१ मधील ३३.८१ अब्ज डॉलरच्या तुलनेत ३.५२ टक्के घटून यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये ३२.६२ अब्ज डॉलर झाली आहे. तर व्यापार तुट वाढून २६.७२ अब्ज डॉलर झाली आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, वाणिज्य मंत्रालयाने याबाबतची प्राथमिक आकडेवारी जारी केली आहे. या आकडेवारीनुसार देशातील आयात गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील ५६.२९ अब्ज डॉलरच्या तुलनेत ५.४४ टक्क्यांनी वाढून ५९.३५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. देशाच्या निर्यातीत घसरण झाली असली तरी आयातीत वाढ झाल्याचे दिसून आले. सरकारी आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या काळात निर्यात १५.५४ टक्क्यांनी वाढून २२९.०५ अब्ज डॉलर झाली आहे. याच कालावधीत आयात ३७.८९ टक्के वाढून ३७८.५३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या सहा महिन्यांत निर्यात वाढत होती. त्याच पद्धतीने आयातही उच्च स्तरावर आहे. त्यामुळे व्यापार तुटीच्या आकडेवारीत भर पडली आहे.