कोल्हापूर : शिरोळ येथील शेतकरी वजनकाट्याने साखर कारखानदारांकडून होणारी काटामारी उघडकीस आणली आहे. कारखानदारांकडून उसाच्या वजनात २० ते १५० किलोपर्यंतची काटामारी होत असल्याचे या वजनकाट्याने उघडकीस आणले आहे. हा वजनकाटा उभारुन कारखानदारांची चोरी पकडण्यात यशस्वी झाल्याचा दावा ‘आंदोलन अंकुश’ संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे. शिरोळ येथे शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करुन ३२ लाख रुपये खर्चून या वजनकाट्याची उभारणी केली आहे. त्यामुळे परिसरातील कारखान्यांनी स्वतःचे वजनकाटेही दुरुस्त केल्याचे समजते.
शेतकरी वजनकाट्यावर सर्व रिकाम्या वाहनाचे व कारखान्याच्या काट्यांवर आलेले वजन यात तफावत नाही. कारखाने उसाने भरलेल्या वाहनांची व रिकाम्या वाहनाचे वजन करण्यासाठी स्वतंत्र काटे वापरतात असे वाहनमालक सांगतात. खरेतर एकाच काट्यावर वजन करणे बंधनकारक आहे. मात्र साखर आयुक्तांचे आदेश कारखाने पाळत नाहीत. चुडमुंगे म्हणाले की, एका महिन्यात शेतकरी वजन काट्यावर ६०० वाहनांची वजने मोफत झाली आहेत. काट्यावर गुरुदत्त, जवाहर, दत्त शिरोळ, शरद, पंचगंगा, दत्त इंडिया व कर्नाटकातील वेंकटेश्वरा या कारखान्यांची वाहने वजन करून गेली.