सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गाळपात मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने आणि खासगी साखर कारखान्यांमध्ये आवताडे शुगर्सने गाळपात वर्चस्व राखले आहे. जिल्ह्यात उसाच्या दराची स्पर्धा सुरू झाल्यानंतर साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांनी आपल्या कारखान्याला ऊस घालावा, यासाठी मनधरणी सुरू असल्याचे चित्र आहे. ज्या कारखानदारांनी मागील गाळपातील व चालू गाळपाला योग्य दर दिला आहे, त्या कारखान्याकडे शेतकऱ्यांनी आपला ऊस दिला आहे.
मंगळवेढा तालुक्यामध्ये चार साखर कारखाने आहेत. सहकारी तत्त्वावरील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने साखर उताऱ्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. कारखान्याला सरासरी १०.११ उतारा मिळाला आहे. आवताडे शुगर्सला ९.४८, युटोपियन शुगर्सला ९.४१, तर भैरवनाथ शुगर्सने आकडेवारी जाहीर केली नाही. आवताडे शुगर्सने एक फेब्रुवारीअखेर ३,२९,७५५ गाळप केले असून संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने २,९५,६५० गाळप केले आहे. युटोपियन शुगर्सने ३,२९,२९६ आणि भैरवनाथ शुगर्सकडून २,६५,५१६ मे. टन उसाचे गाळप केले आहे.