सोलापूर : गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे नदी, धरणे कोरडी पडली आहेत. बोअर, विहिरीनीही तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याअभावी हजारो हेक्टरवरील ऊस लागवड खोळंबली आहे. विशेषतः पंढरपूर तालुक्यात भीमा नदी, नीरा खोऱ्यातील धरणे अद्याप कोरडी असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
पंढरपूर तालुक्यात भीमा नदी, उजनीचा डावा- उजवा कालवा, वीर, भाटघरचे पाणी यामुळे सर्वाधिक उसाचे क्षेत्र आहे. ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी जमिनी तयार करून ठेवल्या आहेत, पण पाऊस नसल्याने ऊस लागवड होवू शकलेली नाही. काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या पाणी साठ्यावर ऊस लागवड केली असली तरी त्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे पीक जगवण्यासाठी त्यांना धडपड करावी लागत आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीतील पाऊस व पोषक वातावरणामुळे चार महिन्यात उसाची झपाटयाने वाढ होते. त्यामुळे सरासरी उसाचे उत्पन्न वाढते. मात्र यंदा अद्याप पाऊस झाला नसल्याने कृत्रिम पाण्यावर उसाची वाढ म्हणावी तशी होताना दिसत नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.