सोलापूर : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 138 कोटी रुपये अद्याप साखर कारखानदारांनी दिलेले नाहीत.आता खरीप हंगामाने गती घेतली आहे. त्याच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना पैसे मिळणे गरजेचे आहे.13 साखर कारखान्यांनी गाळप हंगामातील एफआरपीचे पैसे दिलेले नाहीत.त्यामुळे जिल्ह्यातील पाच कारखान्यांवर साखर आयुक्तालयाकडून आरआरसी (महसूल वसुली प्रमाणपत्र) कारवाई झाली आहे. साखर कारखान्यांकडील साखर जप्त करण्याची तरतूद त्यामध्ये आहे.
साखर आयुक्तालयाकडून झालेल्या कारवाईत म्हैसगावच्या विठ्ठल कार्पोरेशनवर २ फेब्रुवारीला ५६.७४ कोटी व 26 मार्चला 29.38 कोटी रुपयांची अशी दोनदा आरआरसी झाली.मातोश्री कारखान्यावर 22.56 कोटी, विठ्ठल रिफाइंडवर 16.21 कोटी, तर आदिनाथ कारखान्यावर 0.68 कोटी रुपयांची 31 मे रोजी आरआरसी कारवाई करण्यात आली आहे. यंदाच्या गळीत हंगामात 36 कारखान्यांचा समावेश होता.कारखान्यांकडे फेब्रुवारीअखेर 414 कोटी रुपये थकीत होते. मार्चअखेर 452 कोटी तर एप्रिलअखेर 257 कोटी रुपये थकले.15 मेअखेर 18 कारखान्यांकडे 195 कोटी अडकले होते. यापैकी 59 कोटी रुपये कारखान्यांनी दिले आहेत.