सोलापूर :जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळसदृश स्थिती आहे.यावर्षी मान्सूनने वेळेवर हजेरी लावली असल्याने खरिपाच्या पिकांबरोबरच फळबागांचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढणार आहे. काही ठिकाणी उसाचे क्षेत्र कमी होऊन त्या ठिकाणी फळबागांचे क्षेत्र वाढत आहे.त्याला शेतकऱ्यांना भेडसावणारा उसाच्या थकीत बिलांचा प्रश्न कारणीभूत आहे.सद्यस्थितीत उजनी धरणाचा पाणीसाठा ४३ टक्क्यांपर्यंत गेल्याने स्थिती बदलून गेली आहे.पंढरपूर तालुक्याच्या पट्ट्यात मात्र ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.
मोहोळ तालुक्यात साडेदहा हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.बार्शी तालुक्यातही ९५ हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाच्या पेरणीची शक्यता आहे.उत्तर सोलापूर तालुक्यामध्येही तालुक्यात २७ हजार १६६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीची शक्यता आहे.उडीद, मूग, भुईमूग, तूर या खरिपाच्या पिकांची जागा सोयाबीनने घेतली आहे.केळी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ दिसत असून सांगोल्यात डाळिंब फळबागांचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांकडे अद्याप ऊस बिले थकली आहेत.शेतकऱ्यांकडून वारंवार विचारणा होऊनदेखील अद्याप त्यांची बिले देण्यात आलेली नाहीत. त्यामुळी काही शेतकऱ्यांनी ऊस शेतीकडे पाठ फिरवली आहे.