कानपूर : नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्या (NSI) गेल्या ८८ वर्षांच्या वाटचालीत डॉ. सीमा पारोहा या पहिल्या महिला संचालक बनल्या आहेत. एनएसआयच्या २० व्या संचालक म्हणून, डॉ. पारोहा यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. त्या संस्थेच्या पहिल्या महिला संचालक आहेत. संस्थेत आतापर्यंत सुरू असलेल्या पदविका अभ्यासक्रमांबरोबरच येथे पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास आपले प्रथम प्राधान्य असेल, असे डॉ. सीमा पारोहा यांनी सांगितले.
डॉ. सीमा पारोहा म्हणाल्या की, देशातील या एकमेव साखर संस्थेचे साखर विद्यापीठात रुपांतर करण्याचा माझा सर्वतोपरी प्रयत्न असेल. त्यासाठी संबंधित मंत्रालयाशीही संवाद साधावा लागेल. या संस्थेतील महिलांची पोकळी भरून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. सीमा या गेल्या १० वर्षांपासून संस्थेत काम करीत आहेत.