नवी दिल्ली : देशात यंदा उसाचे उत्पादन वाढल्याने गाळप वर्ष २०२०-२१ मध्ये १५ जूनअखेर साखर उत्पादन १३ टक्क्यांनी वाढून ३०६.६५ लाख टनावर पोहोचले आहे. साखर उद्योगातून ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे. गळीत हंगामाचे वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर असे गृहित धरले जाते.
यासोबतच देशात आतापर्यंत ५८ लाख टन साखर निर्यातीचे करार करण्यात आले आहेत. त्यापैकी ४५ लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) सांगितले की, देशभरातील साखर कारखान्यांनी एक ऑक्टोबर २०२० ते १५ जून २०२१ या कालावधीत ३०६.६५ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत झालेल्या २७१.११ लाख टन साखर उत्पादनापेक्षा हे उत्पादन ३५.५४ लाख टनाने अधिक आहे. सद्यस्थितीत देशात केवळ पाच साखर कारखाने सुरू आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये २०२०-२१ या कालावधीत साखर उत्पादन ११०.६१ लाख टन झाले आहे. तर गेल्यावर्षी याच कालावधीत हे उत्पादन १२६.३० लाख टन झाले होते. महाराष्ट्रातील साखर उत्पादन गेल्यावर्षीच्या ६१.६९ लाख टनावरुन वाढून १०६.२८ लाख टनावर पोहोचले आहे. तर कर्नाटकातही आधीच्या ३३.८० लाख टनावरुन वाढ होऊन ४१.६७ लाख टन साखर उत्पादीत झाली आहे.
इस्माने सांगितले की, बंदरांवर आणि बाजारपेठेतून मिळालेल्या माहितीनुसार, साखर कारखान्यांनी २०२०-२१ या वर्षासाठी मंजूर झालेल्या ६० लाख टन साखर निर्यातीच्या सरकारी कोट्याच्या तुलनेत आतापर्यंत ५८ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. मात्र, आतापर्यंत यातील ४५.७४ लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे. जून २०२१ मध्ये आणखी ५-६ लाख टन साखरेची निर्यात करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती इस्माच्यावतीने देण्यात आली. याशिवाय साखर उद्योगाने २०१९-२० या वर्षाच्या निर्यात कोट्यातील ऑक्टोबर-डिसेंबर २०२० या तिमाहीत ४.४९ लाख टन साखरेची निर्यात केली होती. यावर्षी साखरेची मागणी २६० लाख टनाहून अधिक राहू शकेल असा अंदाज इस्माने व्यक्त केला. गेल्यावर्षी साखरेची मागणी २५३ लाख टनावर होती. साखर निर्यात ७० लाख टनावर होईल असे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे.
इस्माने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या हंगााच्या तुलनेत सप्टेंबर अखेरपर्यंत ८-१० लाख टन अधिक देशांतर्गत साखर विक्री होण्याची शक्यता आहे. याशिवाय साखर निर्यात ७० लाख टनांवर पोहोचेल. त्यामुळे सप्टेंबर २०२१ मध्ये साखरेचा अतिरिक्त साठा गेल्यावर्षीच्या तुलनेत २०-२५ लाख टनांनी कमी राहील.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link