कोल्हापूर : गतवर्षी तुटलेल्या उसाचे २०० आणि सध्याच्या गाळप हंगामातील उसाला प्रति टन ३७०० रुपये दर देत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांनो कोयता बंद आंदोलन करा. निवडणुकीत कारखानदारांनी मतासाठी पैसे वाटले. हे आपल्याच उसाचे पैसे आहेत. उसाचा दर ठरवण्याचा अधिकार आपला आहे. त्यामुळे गुरुवारपर्यत निर्णय द्या अन्यथा तीव्र आंदोलन सुरू होईल, असा इशारा ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिला.
शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज तख्त येथे रविवारी रात्री आंदोलन अंकुशची एल्गार परिषद झाली. यावेळी चुडमुंगे बोलत होते. चुडमुंगे म्हणाले, माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील हे देखील आपल्यासोबत आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे हंगाम पुढे गेला आहे. आता उसाला चांगला दर घ्यायचा असेल तर आणखीन १५ दिवस थांबण्यास काय अडचण आहे. आपण या आंदोलनातून एक चांगला पायंडा पाडू. जेणेकरून यापुढे ऊस दरासाठी ३ ते ४ वर्षांत कदाचित आंदोलनही करायला लागणार नाही. यावेळी अक्षय पाटील, दीपक पाटील, कृष्णा देशमुख, उदय होगले आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत श्रीमंत राकेश जगदाळे यांनी केले.