पुणे: महाराष्ट्रातील २०२०-२१ मधील साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. उपलब्ध माहितीनुसार १५ मे पर्यंत हंगाम समाप्त होण्याची शक्यता आहे.
प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, साखरेचे उत्पादन आता १०५ लाख टनापर्यंत पोहोचत आहे. हे उत्पादन १०७ लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. राज्याचा सध्याच्या सरासरी साखर उतारा १०.४८ टक्के इतका आहे. तर साखर उत्पादन १०५ टन झाले आहे. एकूण ९९९.५० लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. अद्याप २ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे.
कोल्हापूर आणि सांगली विभागातील बहुतांश कारखान्यांचे गाळप आटोपले आहे. पुणे आणि सातारामधील बहुतांश कारखान्यांनी आपला हंगाम पूर्ण केला आहे तर काहींचा अंतिम टप्प्यात आहे. मराठवाडा विभागातील कारखान्यांचे गाळप मे अखेरीस संपण्याची शक्यता आहे. चांगल्या उत्पादनानंतरही साखरेच्या मागणीत कपात झाल्याने शेतकऱ्यांना पैसे देण्यात अडथळे येत आहेत.
सद्यस्थितीत ऊस उत्पादकांचे २,०७३.०५ कोटी रुपये थकीत आहेत. कारखानदारांनी आतापर्यंत १९,२८६.६५ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. ही रक्कम यंदाच्या हंगामातील एकूण एफआरपीच्या ९०.२९ टक्के आहे. शेतकऱ्यांना एकूण २१,३५९.६९ कोटी रुपये देय आहेत.