सातारा : कोल्हापूर जिल्ह्यातील कोतोली (ता. शाहूवाडी) येथील शेतकरी अरुणकुमार दौलू पाटील यांच्या गुळाला कऱ्हाड येथील शेती उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी झालेल्या सौद्यात उच्चांकी ६,८०० रुपये दर मिळाला. तर कऱ्हाड तालु्क्यातील पार्ले येथील शेतकरी निखिल मारुती नलवडे यांच्या गुळाला ६,४०० रुपयांचा दर मिळाला. बाजार समितीत गुरुवारी झालेल्या सौद्यातील गुळाची आवक मे. शिवतेज ट्रेडिंग कंपनी या आडत दुकानांत झाली होती. यार्डमधील खरेदीदार व्यापारी मे. ए. एफ. ट्रेडर्स व मे. डी. के. ब्रदर्स यांनी गूळ खरेदी केला.
आजच्या सौद्यांमध्ये ४४८ क्विंटल गुळाची विक्री होऊन सरासरी भाव ४,१०० रुपये मिळाला. शेतकरी निखिल नलवडे यांचा सत्कार बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांच्या हस्ते झाला. संचालक जयंतीलाल पटेल, शिवतेज ट्रेडिंग कंपनीचे मालक उत्तमराव जाधव, बाजार समितीचे प्रभारी सचिव आबासाहेब पाटील, संतोष पवार, दिलीप पाटील, सचीन पवार, संपत बडेकर, भाजीपाला मार्केट असोशिएशनचे अध्यक्ष वसंतराव आळंदे आदी उपस्थित होते. दरम्यान, येथील गुळाला दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, राजस्थान येथून मागणी असते. त्यामुळे गुळाची उलाढालही मोठ्या प्रमाणात होते असे सभापती विजयकुमार कदम यांनी सांगितले.